सातारा : कराडमध्ये देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेली दुक्कल जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांना यश आले आहे. संबंधितांकडून 65 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रशांत प्रदीप जाधव (रा. कराड), संजू भावरसिंह अनारे (रा. धायडी, धरणीतंडा, जि. धार, राज्य मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी सातारा जिल्हयामध्ये अवैध देशी बनावटीच्या अग्निशस्त्रांची विक्री करणार्या व्यक्तींची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सर्व पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना अवैध देशी बनावटीच्या अग्निशस्त्रांची विक्री करणार्या व्यक्तींची माहिती काढून त्यांचेवर कारवाई आदेश दिले.
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व कराड शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पथक कराड शहरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कराड शहरातील पंकज हॉटेलच्या पाठीमागे एक इसम स्वत:चे कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून उभा आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांना माहितीचा आशय सांगून इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने पंकज हॉटेल परिसरात जावून सापळा लावून प्राप्त माहितीमधील व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 65 हजार रुपये किमतीचे 1 देशी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कोल्हाळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, पोलीस अंमलदार शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, अरुण पाटील, राजू कांबळे, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, स्वप्नील लोखंडे, स्वप्नील कुंभार, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, कराड शहर पोलीस ठाण्याकडील सज्जन जगताप, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, विजय गुरव यांनी सहभाग घेतला. कारवाईमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी अभिनंदन केले आहे.
कराडमध्ये देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेली दुक्कल जेरबंद; सातारा स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्यांची संयुक्त कारवाई
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा