भुईंज : वाई तालुक्यातील मोहडेकरवाडी येथे वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून सख्ख्या लहान भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अजित रामचंद्र बांदल (वय ३८) असे खून झालेल्या भावाचे नाव असून, याप्रकरणी संशयित आरोपी भाऊ दीपक रामचंद्र बांदल (वय ४६, रा. मोहडेकरवाडी, ता. वाई) याच्याविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत अजित बांदल यांची पत्नी रेणुका बांदल (वय ३८) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अजित आणि संशयित दीपक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. वडिलांना दारू पिऊन वारंवार त्रास दिला जात असल्याच्या कारणातून दोघा भावांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हमरीतुमरी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित दीपक याने अजितला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने रागच्या भरात अजितच्या डोक्यात लाकडी दांडक्याने गंभीर प्रहार केले.
या जीवघेण्या हल्ल्यामध्ये अजित बांदल हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा गेम केल्याच्या या घटनेमुळे मोहडेकरवाडी आणि संपूर्ण वाई परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
घटनेची गांभीर्याने दखल घेत भुईंज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. साळुंखे आणि भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करत आहेत.