शिव्यांच्या लाखोलीने रंगला बोरीचा बार

बोरी-सुखेडची अनोखी परंपरा

by Team Satara Today | published on : 31 July 2025


लोणंद : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या सुखेड व बोरी या दोन गावांमधील महिलांनी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी पारंपरिक बोरीचा बार साजरा केला. शिव्यांच्या लाखोलीतून वर्षानुवर्षांची परंपरा यंदाही जिवंत ठेवली. तीनशेहून अधिक महिलांनी ओढ्याच्या पाण्यात उभं राहून एकमेकींना शिव्या देत, हातवारे करत व टाळ्या वाजवत तब्बल पाऊण तास हा रंगतदार बार घातला.

यंदाही नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुखेड गावातील महिला डफ, ताशा, शिंगाच्या गजरात प्रथम ओढ्याच्या तीरावर दाखल झाल्या. त्यानंतर बोरी गावातील महिलाही जय्यत तयारीत बारात सामील झाल्या. हातवारे, शिव्यांची लाखोली, ढोल-ताशांचा आवाज आणि उंच स्वरांत टाळ्यांचा कडकडाट यामुळे परिसर थरारक झाला. बघ्यांची प्रचंड गर्दी, महिलांचा वाढता उत्साह आणि ओढ्यात सोडलेले धोम-बालकवडी धरणाचे पाणी या सर्वांमुळे पारंपरिक वातावरण तयार झाले होते.

पाण्यात उभ्या राहून महिलांनी असा एकमेकींना आव्हान देत बार घातला की त्यांना आवरताना पोलीस व ग्रामस्थांची धांदल उडाली. पोलिसांनी वाद्ये बंद करण्याचा प्रयत्न केला, तरीही महिलांनी टाळ्यांवरून आणि हातवार्‍यांवरून बार सुरूच ठेवला. सुखेड व बोरी या दोन्ही गावांमधून जाणार्‍या ओढ्याला यावर्षीही पाणी होते. त्यामुळे या पाण्यामध्ये काही नागरिक उभे राहून दोन्ही बाजूच्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्यावतीने दोरी लावून दोन्ही बाजूच्या महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला.

बार संपल्यानंतरही महिलांनी एकमेकींकडे हातवारे करत, टाळ्या वाजवत सुमारे 100 फूट अंतरावरूनही परंपरा पूर्ण केली. यानंतर दोन्ही गावांमध्ये झिम्मा, फुगडी, फेर धरणे यासारखे पारंपरिक खेळ पार पडले. सुखेडच्या माळावर पाळणे, मेवा मिठाई, स्टेशनरी आदी विक्रीसाठी लावलेली दुकाने व बालकांची गर्दी लक्षवेधी ठरली. पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद व इतर पोलीस ठाण्यांच्या पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही.

या परंपरेचा उद्देश कुणालाही दुखावण्याचा नसून, ही एक लोकरंजनात्मक सामाजिक परंपरा आहे, जिच्यातून गावकर्‍यांचे एकत्र येणे, सांस्कृतिक जिवंतपणा आणि स्त्रियांच्या सामाजिक सहभागाचे दर्शन घडते. याला कोणी श्रद्धा म्हणते तर कोणी अंधश्रद्धा म्हणते .बोरीचा बार पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

सुखेड-बोरी गावांच्या महिलांचा अनोखा वादपरंपरेचा जलोत्सव - शिव्यांच्या लाखोलीत पारंपरिक बोरीचा बार थाटात साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात, ओढ्यातील पाण्यात उभ्या राहून महिलांनी उलगडली वर्षानुवर्षांची परंपरा - बोरीचा बार अनुभवणार्‍यांची प्रचंड गर्दी केली होती. वाद, जल, शिव्या आणि उत्साह यांचा संगम - महिलांच्या हातवार्‍यांनी ओढा गजबजला. पोलिस बंदोबस्तात हा बोरीचा बार भरला.

अशी आहे अख्यायिका

बोरीच्या बारामागे एक जुनी आख्यायिका सांगितली जाते. बोरी गावाच्या पाटलाच्या दोन बायका, एक सुखेड तर दुसरी बोरी गावात राहत होती. दोघीही एकदा ओढ्यात कपडे धुण्यास गेल्या असता त्यांच्यात वाद होऊन त्या दोघी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या. तो दिवस नागपंचमीचा दुसरा दिवस होता. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्या वादाच्या प्रतीक स्वरूपात आजतागायत हा बोरीचा बार साजरा केला जातो.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा
पुढील बातमी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीचा अपघात

संबंधित बातम्या