लोणंद : लोणंद -नीरा रस्त्यावर नवीन उड्डाण पुलाजवळ दुचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रगतशील शेतकरी रामचंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. वाढदिनीची काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामचंद्र शेळके हे गुरुवारी सायंकाळी लोणंद-निरा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळून शेतातून घरी येत होते. यावेळी दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुरुवार रामचंद्र शेळके यांचा वाढदिवस. त्यामुळे सकाळपासूनच मित्रपरिवार व नातेवाईकांनी व्हॉट्सॲप ग्रुप ,स्टेटसवर त्यांचे फोटो ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, सायंकाळी झालेल्या अपघाताची बातमी समजताच आनंदाच्या शुभेच्छांचे संदेश काही तासांतच दुःखद श्रद्धांजलीच्या पोस्टमध्ये बदलले. रामचंद्र शेळके हे लोणंद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.