दोन आमदार तरीही संगम माहुलीचा पुल झाला 'नाम' दार

ब्रिटीशकालीन पुलाला सव्वाशे वर्ष पूर्ण ; नवीन पुलाचा नुसताच बागुलबुवा

by Team Satara Today | published on : 18 October 2025


सातारा : संगम माहुली, ता.  सातारा या ठिकाणी असणाऱ्या कृष्णा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाला सव्वाशे पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले असून, त्या ठिकाणी पुल दुर्घटनेची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. दरम्यान, सातारा- सोलापुर या महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान या पुलाच्या उजव्या बाजूला दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले. मात्र केवळ दहा टक्के बांधकाम पूर्ण करून ते बंद करण्यात आल्यामुळे या मतदारसंघात दोन आमदार असतानाही हा नविन पुल फक्त 'नाम'दारच का झाला? अशा चर्चा आता वाहन चालकांसह प्रवाशांमध्ये झडू लागल्या आहेत.

सातारा- सोलापूर या महामार्गावर संगम माहुली येथील कृष्णा नदीवर १९१५ साली ब्रिटिशकालीन पूल उभारण्यात आला होता. दळण- वळणासाठी सातारा- सोलापूर हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा समजला जात असून या महामार्गावरून पुसेगाव, गोंदवले,वडूज, दहिवडी, म्हसवड, शिंगणापुर,  पिलीव, माळशिरस, पंढरपूर, अकलुज, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापुरसह हैदराबादकडे मोठ्या प्रमाणावर दिवस -रात्र वाहनांची ये-जा सुरू असते. संगम माहुली येथे बांधलेला ब्रिटिशकालीन पुल हा अत्यंत उंचीवर असून नदीपत्रापासून तो १०० फूट वर बांधण्यात आला आहे. फुलाच्या दोन्ही बाजूला ॲल्युमिनियमच्या पट्टयांचे रेलिंग असून ते सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. दिवस-रात्र वाहतूक या पुलावरून सुरू असल्यामुळे अनेकदा या पुलावर पावसाने खड्डे पडत असे मात्र ते वेळोवेळी भरले जात असल्यामुळे पुलाला कोणताही धोका नव्हता. आता मात्र हा पुलाने शंभरी पार पाडली आहे. त्यासंदर्भात संबंधित विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे पत्रही दिले आहे. दोन वर्षांपूर्वी सातारा- सोलापुर या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंटपासून सुरू करण्यात आले. हे काम सातारा ते संगम माहुली, त्रिपुटीपासून पुढे ठिकठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. रुंदीकरणाचे काम हाती घेताना संगम माहुली येथील कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन फुलानजिक संगम माहुली गावच्या दिशेला दुसऱ्या नवीन पुलाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली होती. हे काम सुरू झाल्यामुळे विशेष करून अवजड वाहन चालकांना फार मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला होता. या पुलाचे काम सुरू असताना सातारकडील एका पिलरचे काम पूर्ण झाले असून नदीच्या पलीकडे क्षेत्रमाहुली बाजूला मात्र जमिनीमध्ये केवळ लोखंडी सळई रोवण्यात आलेल्या आहेत. तिथून मात्र पुढे या नवीन पुलाचे बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. हे काम थांबवण्या पाठीमागे काय कारणे आहेत? याबाबत गेल्या दोन वर्षांपासून वाहन चालकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे ब्रिटिशकालीन पुलाने शंभरी पार केल्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नवीन पुलाचा नुसताच बागुलबुवा करून खोटा दिलासा दिल्यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

संगम माहुली आणि क्षेत्रमाहुली या दोन गावांना हा पुल जोडतो. ही दोन्ही गावे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोडत असून या मतदार संघातून एकनाथराव शिंदे शिवसेना गटातून महेश शिंदे हे विजयी झाले आहेत तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. थोडक्यात या मतदारसंघाला महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्या रूपाने दोन आमदार मिळाले असतानाही संगम माहुली येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम रखडले कसे? शंभरी पार केलेल्या ब्रिटिश पुल दुर्घटनाग्रस्त झाला तर त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. दोन आमदार तरीही संगम माहुलीचा पुल झाला 'नाम' दार.....! अशा जोरदार चर्चा परिसरामध्ये झडू लागल्या असून दोन्हीही शिंदे आमदारांनी स्वतः जातीने लक्ष घालून अर्धवट बंद केलेल्या नवीन पुलाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वाहन चालकांमधुन होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा...!
पुढील बातमी
भटक्या विमुक्तांचा समावेश आदिवासीमध्ये करावा, अन्यथा आंदोलन; पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांचा इशारा

संबंधित बातम्या