सातारा : शासनाची कोणतीही नवीन योजना सुरु केली तर ती राबविण्याची महसूल विभागाला प्रथम जबाबदारी दिली जाते. महसूल विभाग हा प्रशासनातील महत्वाचा घटक आहे. महसूल दिनानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड आदी उपस्थित होते.
अनंत काळापासून महसूल विभाग कार्यरत आहे. आपआपल्यापरिने यामध्ये सर्वांनी योगदान दिले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कामकाजाच्या मदतीसाठी पुर्वी साधने उपलब्ध नव्हती आपण आता सॅटेलाईट पर्यंत पोहचलो आहे. आत्ताचे मिसूल विभागाचे काम डिजीटल झाले आहे. 1 ते 7 ऑगस्ट पर्यंतच्या महसूल सप्ताहात प्रत्येक दिवशी विविध उपक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला आहे यामध्ये या सप्ताहातील कामांची नोंद घेण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी थेट येऊन सांगाव्यात. महसूल सप्ताह राबविण्यातही अग्रेसर राहील या पद्धतीने काम करा, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्हा विविध योजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी पाटील यांची बदली झाली आहे, परंतू महाबळेश्वर तहसीलदार पदी त्यांना परत आणा, असे महाबळेश्वर परिसरातील नागरिक सांगत आहे. त्यांनी तालुक्यात चांगले काम केले आहे. त्याची दाद नागरिकांनी घेतली हीच आपल्या कामाची पोहोच पावती आहे. अशाच पद्धतीने इतरांनीही काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
प्रत्येक नागरिकाच्या जीवनात अनेकदा महसूल विभागाचा संबंध येतो. महसूल विभाग अत्यंत महत्वाचा असून या विभागावर मोठी जबाबदारी आहे. महसूल सप्ताहात शासनाच्या सर्व योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन सांगितले.
महसूल दिन हा महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहित करण्यात येते. या विभागावर शासनाने अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या सक्षमपणे जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. नागरिकांकडून येणारे काम किंवा तक्रारी संवेदशिनपणे हाताळावे, असे अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी महसूल सप्ताहात करण्यात येणाऱ्या कामकाजाची व मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा सांगितला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच सुत्रसंचालक सितल करंजेकर यांनी केले. सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.