विडणी येथे इलेक्ट्रिक स्कूटर दुभाजकावर आदळून तरुणी ठार; बहीण व आजी गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 05 September 2026


फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील विडणी (ता. फलटण) हद्दीत दुभाजकाला इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची लहान बहीण व आजी गंभीर जखमी झाल्या. सिद्धी दशरथ पवार (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धी पवार ही आपली लहान बहीण रिद्धी व आजी कौसल्याबाई यांच्यासह इलेक्ट्रिक स्कूटरवरून विडणीच्या दिशेने निघाली होती. गाडे-पवारवस्ती परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावरील दुभाजकाला स्कूटरची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर गाडी सुमारे २० फूट पुढे घासत जाऊन थेट विजेच्या खांबावर आदळली.
या भीषण अपघातात सिद्धीच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेल्या रिद्धी व कौसल्याबाई या दोघी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत सिद्धी ही फलटण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात जाताना बहीण व आजीला विडणी गावात सोडून ती पुढे फलटणला जाणार होती; मात्र त्यापूर्वीच हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहू स्टेडियमबाहेर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा - पालकमंत्री शंभूराज देसाई, कवठे येथे जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम

संबंधित बातम्या