सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. अजिंक्यतारा किल्ल्यावर प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोबत लवकरात लवकर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जिल्हाधिकारी पाटील यांना दिले.
याशिवाय माहुली येथील राजघराण्यातील महनीय व्यक्तींच्या समाधी स्थळांचे विकसन व घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकसनाच्या संदर्भाने शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यामध्ये विकास कामांचे अनेक प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली प्रगतीपथावर असून त्याचा आढावा टप्प्याटप्प्याने घेतला जात आहे. काही महत्त्वांच्या विकास कामासंदर्भात आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भवनामध्ये बैठक झाली. या बैठकीचे तपशील स्वतः बैठकीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
किल्ले अजिंक्यतारा येथे शिवसृष्टी उभारण्याच्या संदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी मागे कल्पना मांडली होती. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली काय? असे जिल्हाधिकार्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन त्याची प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांसह पाहणी करणे आणि त्या कामांचे प्रस्ताव तयार करून ते राज्य शासनाला पाठवणे, यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. माहुली येथील राजघराण्यातील महनीय व्यक्तींच्या समाधी स्थळांचे विकसन तसेच घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाच्या विकसना संदर्भात संबंधित जागा मालकाला मोबदला देण्याच्या दृष्टीने सुद्धा प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. सर्व विकास कामांचे आराखडे तयार करून राज्य शासनाला पाठवले जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.