सातारा : एखाद्या परिसराची ओळख केवळ रस्ते आणि इमारतींमुळे निर्माण होत नाही, तर त्या परिसराशी जोडलेल्या सामाजिक विचारांमुळेही ती अधिक समृद्ध होते. सदर बाजारमधील प्रभाग क्रमांक चारमधील उद्यानाला ‘भिमाई आंबेडकर उद्यान’ हे नाव मिळाल्याने अशाच एका सामाजिक भावनेला सन्मान मिळाला आहे. गेल्या दशकाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या नागरिकांच्या मागणीवर संविधान दिनी शिक्कामोर्तब झाले.
सदर बाजार परिसरातील या उद्यानाला माता भिमाई आंबेडकर यांचे नाव देण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. स्थानिक नागरिकांनी यासाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. नागरिकांच्या या भावनेला लोकप्रतिनिधींनीही पाठबळ दिले. नगरसेवक निशांत पाटील आणि नगरसेविका भारती मनोज सोलंकी यांनी नगरपरिषद स्तरावर निवेदने देऊन या विषयाचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
२६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यानाचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या निर्णयाला केवळ नामफलक बदलण्यापुरते महत्त्व न राहता सामाजिक समता, त्याग आणि परिवर्तनाच्या विचारांची आठवण जपणारा संदर्भ प्राप्त झाला आहे. महामाता भिमाई आंबेडकर यांच्या नावाने उद्यान ओळखले जाणार असल्याने परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी नगरसेवक निशांत पाटील, नगरसेविका भारती मनोज सोलंकी, नगरसेविका जयश्री जाधव, सामाजिक कार्यकर्ते मनोज सोलंकी, फिलिप भांबळ, विशाल कोळी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष मल्लेश जानकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, तालुकाध्यक्ष जुबेर शेख, महिला अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष शाहीन डोंगरे, बहुजन समाज पार्टीचे प्रभारी नितीन लोंढे, जावेद सय्यद, सुनील पवार, सचिन तुपे, गणेश बनसोडे, योगेश तारळेकर, सुधीर सूर्यवंशी यांच्यासह भीमाबाई आंबेडकर नगर आणि सदर बाजार परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दहा वर्षांहून अधिक काळ जपलेली मागणी प्रत्यक्षात उतरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून, उद्यानाच्या माध्यमातून भिमाई आंबेडकर यांचे नाव नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
संविधान दिनी भिमाईंच्या नावाने उद्यानाची ओळख; सदर बाजारच्या नागरिकांचा दीर्घ लढा यशस्वी
प्रभाग क्रमांक चारमधील उद्यानाचे संविधान दिनी नामकरण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मागणीची पूर्तता
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा