सातारा : सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी याही वर्षी सलग तीन दिवस संततधार पावसात सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करत आहेत.
सोमवारी संपन्न होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव रात्री बारा वाजता साजरा होणार असून मंगळवारी दहीहंडी अर्थात दहीकालाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील श्री दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात रविवारी दुपारी शंकराचार्य मठातील ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला .श्री मुरलीधर मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांच्या पुष्पगुच्छ यांची सजावट विशेष लक्षवेधक ठरत आहे.
या मंदिरात असलेल्या सुमारे दीडशे होऊन वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक झुंबरे ही विशेष लक्षवेधक असून याच मंदिराच्या छताला लावण्यात आलेली श्रीकृष्ण तसेच यशोदा आणि राधा कृष्णाची विविध रंगीत पोस्टर्स कृष्ण भक्तांचे लक्ष वेधून घेणारी आहेत.bमुरलीधर मंदिरात सलग तीन दिवस संपूर्ण देशातील मान्यवर गायकांच्या कृष्ण धून तसेच कृष्ण भजने आणि कृष्णभक्ती गीतांनी एक वेगळाच माहोल तयार झाला होता. सुप्रसिद्ध पंडित भीमसेन जोशी, पंडित अनूप जलोटा, पंडित जसराजजी, पंडित जगजित सिंग यांच्या अतिशय सुरेल गायकीने नटलेली ही भजने आणि कृष्ण धून ऐकताना अक्षरशा मन भारावून जात होते.
वेदमूर्ती गोविंद शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या मंत्रजागर कार्यक्रमात 11 ब्रह्मवृंदांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत श्रीरामकृष्ण सेवा मंडळाचे भक्तांनी श्रीमनाम संकीर्तन व श्रीकृष्ण भगवान यांची विविध भजने व भक्ती गीते सादर केली.
सोमवारी सकाळी वेदमूर्ती माधवशास्त्री भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत हवामान पंचसूक्त तसेच श्रीकृष्ण मूर्तीस महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी विविध भजनांचा कार्यक्रम आणि रात्री बारा वाजता पूजा तसेच विष्णुसहस्त्रनाम संपन्न होऊन रात्री बारा वाजता जन्म काळाची महती व कथन करून जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता काल्याचे किर्तन होऊन या जन्माष्टमी कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
दरम्यान सातारा शहरातील खणआळीतील श्रीकृष्ण मंदिर, संत नामदेव मंदिर तसेच कोंडवे अहमदाबाद येथील श्री इस्कॉन मंदिर करंजे पेठेतील श्री महानुभाव पंथाच्या श्रीकृष्ण मंदिरातही विशेष विद्युत रोषणाई तसेच महापूजा अभिषेक याचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील श्री राधाकृष्ण मूर्ती चा विशेष जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधी मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या गोपाल कृष्ण मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फलटण तालुक्यातील गिरवी येथील श्री. देशपांडे यांच्या श्रीकृष्ण मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त विष्णुसहस्त्रनाम पठण तसेच भजन आणि विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.