वर्णे-आबापुरीच्या श्री काळभैरवनाथांच्या यात्रेस १३ मार्चला प्रारंभ; देवस्थान प्रशासनाची जय्यत तयारी

by Team Satara Today | published on : 04 March 2026


सातारा :  जिल्ह्यातील मोठ्या श्री यात्रांपैकी सातारा तालुक्यातील वर्णे-आबापुरीच्या काळभैरवनाथांची यात्रेस दि. १३ मार्च (शुक्रुवार) रात्री हरिजागराने सुरुवात होणार असून दि. १९  मार्चपर्यंत चालणार आहे. 

या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात. याही वर्षी काळभैरव देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत वर्णे, तालुका महसुल, पंचायत समिती, आरोग्य, वीज वितरण कंपनी, बोरगाव पोलीस प्रशासनाची बैठक लवकरच पार पडणार आहे. त्यामध्ये  परस्पर समन्वयाने सुत्रबद्ध नियोजन केले जाणार आहे. यात्रास्थळी मिठाई, खेळणी तसेच गृहपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने येतात.यात्रेस  शुक्रुवार, दि. १३ मार्चला रात्री १२ वाजता मुख्य काळभैरवनाथ मंदिरात  हरीजागराने सुरुवात होईल. खडावा परिधान करण्याचा कार्यक्रम रात्री २ वाजता होईल. देवस्थानचे शिवकळा अधिकारी या धारधार खडावा परिधान करतात. हा सोहळा यात्रेकरू भाविकांसाठी भावनिकव आकर्षणाचा विषय ठरतो. यासाठी मोठी गर्दी होत असते. 

सोमवार, शनिवार दि. १४ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून दुपारी १२ वाजता देवाचा छबिना आपल्या लवाजम्यासह डोंगरावरील मंदिरात जाईल. तेथे भाविकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रथा आहे. सायंकाळी ५ वाजता पालखी, छबिना आपल्या बहिणी जानाई, भवानी माता यांना भेटण्यासाठी वर्णे गावात जाणार आहे. उगवत्या रविवारी म्हणजेच दि.१५ मार्च  रोजी पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी गोपाळ मुहूर्तावर श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

        यात्रा व विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरापर्यंत सुलभपणे जाण्या येण्यासाठी यात्रा स्थळावरील वाहतुकीचे नियोजन बोरगावचे सपोनि प्रशांत हुले व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच जादा कुमक यांच्या माध्यमातुन होईल पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अपर अधिक्षक वैशाली कडूकर, उप अधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त नेमला जाणार आहे.

यात्रेच्या मुख्य दिवशी रविवार, दि. १५ रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार आहे. सोमवार, दि. १६ रोजी दुपारी १२ वाजता पाखाळणी व सायंकाळी ७ वाजता गोंधळ, आरती होऊन या यात्रेची सांगता होणार आहे.गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालणार आहे, तरी सर्व श्री.काळभैरवनाथ भाविक भक्तांनी यात्रेत सहभागी होवून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन  देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार व विश्वस्तांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात पोलिस कवायत मैदानावर शनिवारपासून पौष्टिक तृणधान्य महोत्सव; अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, मंडप उभारणीला प्रारंभ
पुढील बातमी
साताऱ्यात 24 तास पाणीपुरवठ्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी; गुरुकुल टाकीवरून काही भागांना 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न सुरू

संबंधित बातम्या