सातारा : स्वराज्यरक्षिका, करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 35 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत महासंघाच्या वतीने पहिला मोगल मर्दिनी महाराणी, सातारा ताराराणी पुरस्कार जिल्ह्यातील मेजर स्वाती संतोष महाडिक यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला साजेल अशा पुतळ्याची प्रतिमा, स्मृतिचिन्ह अशा स्वरूपातील हा पुरस्कार आहे. जम्मू-काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेले सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या मेजर स्वाती महाडिक या वीरपत्नी आहेत. महाडिक यांचा सैन्य दलातील वारसा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प करीत त्याही सैन्य दलात सहभागी झाल्या आहेत.
हा पुरस्कार वितरण समारंभ 10 डिसेंबर रोजी येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मेजर जनरल एम. एन. काशीद, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे असतील. कार्यक्रमास कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर उपस्थित राहणार आहेत.