गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सण उत्साहात आणि सामाजिक सलोखा ठेवून पार पाडावेत - जिल्हाधिकारी संतोष पाटील, शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

by Team Satara Today | published on : 24 August 2026


सातारा : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून पार पाडावेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विभागांच्या अधिकार्‍यांसह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी उत्सवाच्या नियोजनाबाबत सूचना मांडल्या. बैठकीस अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी विपुल पाटील, नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी विनोद जळक, प्रांताधिकारी आशिष बारकुल, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, निलेश तांबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध मंडळांच्या प्रतिनिधींनी आणि गणेशोत्सव शांतता समितीच्या पदाधिकार्‍यांनी आपापल्या समस्या मांडल्या. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघानेही आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.

 डॉ. वैशाली कडूकर यांनी उपस्थितांच्या डोळ्यात घातले जळजळीत अंजन 

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी तरुणाईला कानपिचक्या देत उपस्थितांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले. त्या म्हणाल्या, पारंपारिक या शब्दाला आपण जागतो का, हे पाहण्याची खरेतर गरज आहे. पारंपारिक गणेश मुर्ती कधी एवढ्या मोठ्या होत्या का? गणेश मुर्ती मोठ्या झाल्या, पण रस्ते अजून आहे तसेच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आम्ही आमचे घरचे गणपती सोडून फक्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतो. आमच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करतानाही आम्ही नसतो. कारण कायदा व सुव्यवस्थेस बाधा होईल अशा घटनांना अटकाव करणे हे आमचे कर्तव्य असते. डीजे बाबत त्या म्हणाल्या, डीजे तुम्ही म्हणाल तसा वाजवा. दोन थरांपेक्षा तीन अथवा चार थर पण लावा, आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र त्या डीजेच्या गाडीवर आपल्या घरातील एखाद्या वृद्धाला किंवा वडिलधार्‍या माणसाला बसवा, म्हणजे त्याची प्रतिक्रिया तुम्हाला समजेल. हे बोलून त्यांनी जेन झी च्या वयावरील तरुणांना आवाहन केले की गणेशोत्सव खरोखरच पारंपारिक पद्धतीने साजरा करावा, त्यामध्ये कर्णकर्कश आवाजाची वाद्ये, डीजे अथवा मद्यप्राशन यांना थारा नसावा. 

त्या पुढे म्हणाल्या, गणेश मंडळांमध्ये डॉल्बीच्या आवाजाची स्पर्धा होण्याऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे. सोलापूरसारख्या शहरात डॉल्बीमुक्त उत्सवाचा विचार होऊ शकतो, तर सातार्‍यातही मंडळांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थानिक कलाकारांनाही रोजगाराची संधी मिळेल, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

खड्डे बुजवून रस्ते मिरवणुकीसाठी सुरक्षित करण्याचे आश्वासन

गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी उद्यापासून एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागांनी आपापली प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे मंडळांच्या परवानगी प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यांचा प्रश्न बैठकीत प्रकर्षाने उपस्थित झाला. नगरपालिका प्रशासनाने आठवडाभरात आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजवून रस्ते मिरवणुकीसाठी सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

उपाययोजनांचे छायाचित्रण करून त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश 

मिरवणुकीच्या मार्गावर लोंबकळणार्‍या वीजवाहिन्या, धोकादायक विद्युत व्यवस्था आणि झाडांच्या फांद्यांमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी संयुक्त पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. केलेल्या उपाययोजनांचे छायाचित्रण करून त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. संबंधित विभागांनी केवळ बैठकीत उपस्थित राहण्याऐवजी समस्यांची पूर्वमाहिती घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तंबीही देण्यात आली. विसर्जनाच्या दिवशी गर्दी आणि जलस्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. संगम माहुली येथील विसर्जन व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. विसर्जनाच्या दिवशी पाण्याची पातळी योग्य राहावी यासाठी पाटबंधारे विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

व्यसनमुक्ती, सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविणार्‍या गणेश मंडळांना नगरपालिका स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात फिरती शौचालये, पार्किंग व्यवस्था, व्हिडिओ चित्रीकरण आणि स्वागत कमानींचीही व्यवस्था केली जाणार आहे.

प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी केले.

शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्याचे प्रशासनासमोर आव्हान

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, स्वच्छता आणि मिरवणूक व्यवस्थेचा आढावा घेत प्रशासनाने यंदा उत्सवपूर्व तयारीला वेग दिला आहे. गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी उद्यापासून एक खिडकी पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्याबरोबरच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, वीजवाहिन्यांची पाहणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची दिली सविस्तर माहिती

शांतता समितीच्या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी रविराज निकम यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कशाप्रकारे रुग्णांना सहाय्यता करता येते आणि कोणकोणत्या आजारांवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत रुग्णांना मिळू शकते, याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातच माझे कार्यालय असून ज्या रुग्णाला या निधीची गरज आहे, त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधल्यास मी नक्कीच त्यांची मदत करेन.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणाने गाठला १०० टीएमसीचा टप्पा; पिण्याच्या पाण्यासह सिंचन, वीज निर्मीतीचा प्रश्न सुटला
पुढील बातमी
कास तलाव परिसरातील हरित वैभवासाठी 10 हजार वृक्षांची मोहीम; 30 ऑगस्टला 500 रोपांनी प्रारंभ

संबंधित बातम्या