दूध उत्पादकांना मिळेना अनुदान

शेतकरी आर्थिक अडचणीत

by Team Satara Today | published on : 29 July 2025


सातारा : गायीचे दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे. अनुदान सुरू असताना ३५ रुपये प्रतिलिटर असलेला दुधाचा दर आता ३१ रुपयांवर घसरला आहे. अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला, तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान कधी मिळणार? या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. या परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

राज्य सरकारने दुधाच्या दरामध्ये वाढ केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता. आता दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला, तरी दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार? या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने सुरुवातीला ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या एका महिन्याच्या कालावधीसाठी दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते, तसेच दूध संघांनी ३.५ फॅट, दुधाला ३० रुपये दर देण्याचे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते.

हे अनुदान अनेक शेतकऱ्यांना आलेच नाही. नंतर पुन्हा एक जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर झाले. तेही अनेक दूध उत्पादकांना मिळालेच नाही. पुन्हा अधिवेशनात दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांची घसरण करून दुधाला अनुदान देण्याची नवीन घोषणा दुग्ध विकासमंत्र्यांनी केली होती; पण शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही.

गेल्या काही महिन्यांत पशुखाद्य व चाऱ्याचे दर वाढलेले आहेत. या तुलनेत दुधाचे कमी झालेल्या दरामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. अनेक जण उसनवारी करून पशुधन सांभाळत आहेत, तर काहींना कमी किमतीला पशुधनाची विक्री केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा
पुढील बातमी
हवामानात झपाट्याने बदल; 9 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

संबंधित बातम्या