जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्सवी माहोल

झेंडे, कमानी, पताका यामुळे वातावरण भगवेमय

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कमानी झेंडे तसेच वेगवेगळ्या शिव जयंतीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात शिवभक्तीचा माहोल तयार झाला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सातारा शहर शिवमय आठवणी मध्ये रमले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या शिवज्योतींचे आगमन होऊ लागले असून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ऐतिहासिक महत्त्व असून यंदा या उत्सवाची साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे यंदाच्या शिवजयंतीला विशेष महत्त्व आहे. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोवाडे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच शिवजयंती अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहरामध्ये नुकताच शिव साहित्य संमेलनाचा समारोप झाला. सायंकाळी किल्ले अजिंक्यतारा येथे मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो मशालींनी हा गड उजळून निघाला. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये शिवभक्तांनी गड पूजन केले. तसेच येथील राजसदरेला सजवण्यात आले होते. तसेच येथे शिवप्रतिमेची सजवलेल्या पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. उपस्थित मावळ्यांनी मशालींनी गड उजळल्यानंतर शिववंदना केली. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शिवाजी जयंतीच्या मुख्य दिवशी म्हणजे बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी सातारा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सातारा शहरामधील चौका-चौकामध्ये इतिहासामध्ये पराक्रमाने आपले नाव अमर करणार्‍या शिवरायांच्या मावळ्यांच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. येथील शिवतीर्थावर शिव पुतळा परिसर सजवण्यात आला असून मावळ्यांच्या प्रतिकृती तसेच साडेआठशे किलो वजनाचा शिवकालीन दरवाजा बसवण्यात आला आहे महाराष्ट्रातून कानाकोपर्‍यातून येणार्‍या शिवज्योतींचे येथे स्वागत केले जात आहे. शिवज्योती घेऊन येणार्‍या शिवभक्तांसाठी शिव संघटनांच्या वतीने अल्पोपहार तसेच इतर सुविधांची सोय करण्यात आली आहे. शिव साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने शिव साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.


मागील बातमी
रामगीतांनी सज्जनगडची संध्याकाळ मोहरली
पुढील बातमी
दरवर्षी शिवसाहित्य संमेलन भरवणार

संबंधित बातम्या