सातारा : कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसह वेगवेगळ्या विकास योजनांसाठी नमामि गंगा धरतीवर नमामि कृष्णा योजना राबवण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले. याशिवाय गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मण इनामदार उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फेज दोन मध्ये करणे आणि उरमोडी मोठा प्रकल्पाच्या तिसऱ्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावाला जलशक्ति मंत्रालय मार्फत मान्यता देणे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. खा. उदयनराजे भोसले यांनी सी. आर. पाटील यांची समक्ष भेट देऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
माण-खटाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला तिसरी प्रशासकीय मान्यता मिळावी. या योजनेमध्ये 32937 हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेचा कृषी सिंचन योजनेच्या वर्ग दोन मध्ये समावेश व्हावा, तसेच उरमोडी सिंचन प्रकल्पाच्या सुधारित तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रस्तावास जनशक्ती मंत्रालयाची मान्यता आहे. उरमोडी धरण 9.96 टीएमसीच्या असून सातारा जिल्ह्यातील साडे सत्तावीस हजार जमीन ओलिताखाली येणार आहे. कण्हेर जोड कालव्याद्वारे बोगद्यातून कण्हेर डावा कालव्यामध्ये नेऊन तेथून पुढे डावा कालवा चाळीस किलोमीटर येथून उरमोडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्प्यात साडेचारशे फूट पाणी उचलून खटाव-माणच्या दुष्काळी भागाला देण्यात येणार आहे.
महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा नदीच्या नमामि कृष्णा योजना या योजने करता स्वतंत्र प्राधिकरण असावे. औद्योगिक प्रदूषण, सांडपाणी यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण वाढत आहे. जलपर्णीचा ठिकठिकाणी विळखा पडत आहे. कृष्णा नदीच्या घाटांचे सौंदर्य बिघडत चालले आहे. याबाबत जनशक्ती मंत्रालयाने ठोस पावले उचलावीत. नमामि कृष्णा उपक्रम राबवल्यास पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे, अशा स्वतंत्र मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी काका धुमाळ, एडवोकेट विनीत पाटील व करण यादव उपस्थित होते.