सातारा : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील महानगर पालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
सदर योजनेंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५०, व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५०, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांची लाभाकरिता निवड केली जाणार आहे. तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये (बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रम) शिक्षण घेणाऱ्या प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक सुजित बर्गे यांनी केले आहे.