सातारा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मधील सुमारे आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्लास्टिक पिशव्या उघड्यावर किंवा कचऱ्यात टाकल्यामुळे मोठे दुष्परिणाम समोर येत आहेत. खाद्याबरोबर हे प्लास्टिक गायीगुरांच्या पोटात जात असल्याने गुरे दगावत आहेत. कचरा जाळल्यामुळे त्यासोबत प्लास्टिकचा धूर होऊन पर्यावरणात दूषित घटक मिसळत आहेत. त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे. जमिनीत गाडले गेलेले प्लास्टिक कुजून नष्ट होत नसल्याने रासायनिक प्रक्रिया होऊन पाणी दूषित होत आहे. त्याचबरोबर जमीन नापीक बनत आहे. हे टाळण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा. एकदा वापरलेले प्लास्टिक कच-यात न फेकता ते पुनर्वापर प्रक्रियेसाठी द्यावे असा हरित साताराचा आग्रह आहे.
घरोघरी जमा होणारे प्लास्टिक एकत्र करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. हरित साताराने पुरवलेल्या हुक मध्ये घरात साठणाऱ्या प्लास्टिक पिशव्या अडकवाव्यात आणि एकत्र गोळा झालेले प्लास्टिक सागर मित्र अभियानाच्या माध्यमातून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले जाईल. सागर मित्र अभियानाचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
शहरातील प्रमुख मोठ्या शाळातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर, पुनर्वापर आणि रिसायकल याबाबत जागरूकता केली जाणार असल्याचे हरित सातारा ग्रुपचे सदस्य, माजी मुख्याध्यापक सुधीर विसापुरे यांनी सांगितले.
यावेळी प्लास्टिकचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे पथनाट्य अमित परिहार यांच्या नाटक कंपनीने विद्यार्थ्यांपुढे सादर केले. अनंत इंग्लिश स्कूलचे शालाप्रमुख एस. एस. गायकवाड, उप शालाप्रमुख ए.एस. शिंदे, जे. डी.देवकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हरित साताराचे प्रकाश खटावकर, उमेश खंडूजोडे, शैलेन्द्र पाटील, अमोल कोडक, सामाजिक कार्यकर्ते दीपक दीक्षित व विद्यार्थी उपस्थित होते.