सातारा : सांगली येथील यशवंत नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजा राजगे या विवाहित तरुणीने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भावस्थेत स्वतःचे जीवन संपवले. या घटनेचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतीर्थ पोवई नाका येथे आंदोलनाकांनी जमून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर तेथून मोर्चा काढण्यात आला.
पोवई नाक्यावरील या आक्रोश मोर्चाला शेकडो हिंदू बांधव जमा झाले होते. त्यांनी धर्मांतर सक्तीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये तब्बल दीडशेहून अधिक बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाला हिंदू समाज कृती समितीच्या वतीने वर्षा डहाळे व सचिन वाळवेकर यांनी संबोधित केले. राजगे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी व राज्यात धर्मांतरांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चात सहभागी झालेल्या सदस्यांनी सर्वप्रथम येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेथून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूची एकजूट करूया, सर्व हिंदू बांधवांनी जातीपातीचे भेद विसरून एकत्र येऊया, सातारा हा पेन्शनदारांचा नाही तर क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, हे दाखवून देऊ या असे आवाहन यावेळी करण्यात आले. धर्मांतर बंदी कायद्याच्या संदर्भाने राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करण्यात आले.