सातारा : खटाव तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासाठी तीन लाख रुपयाची लाच घेताना अध्यक्षाच्या मध्यस्थला आणि त्याच्या अन्य साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक सातारा विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयित रवींद्र गणपत पवार (वय 36 रा. खटाव) व लोकसेवक अनिल सदाशिव गुजर (वय 42, पद ग्रंथालय परिचर, शहाजीराजे महाविद्यालय खटाव) अशी दोघांची नावे आहेत.
तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथील सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. प्राध्यापक या पदावर पदोन्नती करण्यासाठी व कमिटीचे चेअरमन म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी अध्यक्षांचे मध्यस्थ रवी पवार यांच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.
तक्रारदार यांनी दि. 10 मार्च रोजी याबाबत तक्रार केली. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रियंका जाधव, अजयराव देशमुख यांच्या पथकाने सापळा रचलाआणि ग्रंथालय परिचर अनिल गुजर व रवींद्र पवार यांना पंचांसमक्ष लाच घेताना ताब्यात घेतले. ही लाच अध्यक्ष अजित पाटील यांच्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे खटाव तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.