सातारा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू गळीत हंगामात उसाचा प्रतिटन किमान पाच हजार रुपये पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सातारा जिल्ह्यात महामार्ग रोखला. नागठाणे व परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सकाळपासूनच रस्त्यावर ठिय्या देत ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा बोजवारा उडाला. दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनाने साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि अर्जुन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नागठाणे येथे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत ऊस दराच्या प्रश्नावर शासन आणि साखर कारखानदारांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. उसाला पाच हजार रुपये प्रतिटन दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांकडे ऊस पाठवू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने परिस्थिती संवेदनशील बनली होती. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी रुग्णवाहिका आणि एसटी बस यांना आंदोलनातून सूट देण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते आणि वाहतूक खर्च लक्षात घेता सध्याचा ऊस दर परवडणारा नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने ऊस दराबाबत ठोस भूमिका जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आणि ऊस वाहतूक यावर या आंदोलनाचे सावट राहण्याची शक्यता आहे.
पाच हजारांच्या पहिल्या हप्त्यासाठी स्वाभिमानीने महामार्ग रोखला! नागठाण्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
ऊस वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा; दिवाळीच्या तोंडावर साखर कारखानदारांचे धाबे दणाणले
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा