सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदाची धुरा एक पुष्पलता बोबडे यांच्याकडे होती. त्यांनी सभेच्या सुरुवातीलाच बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर विषय वाचनामध्ये सेवेतील मयत कर्जदार सभासदांचे वारसांना बँकेचे विविध मदत निधीतून सध्या २0.१0 लाख मदत दिली जाते, त्यामध्ये वाढ करून ती ३0.१0 लाख देण्याचा निर्णय घेतला गेला. सभा संपतेवेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेवून निषेध नोंदवत घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, त्यांना पाटील यांनी तत्काळ शांत केले. निषेध करण्यापूर्वी संचालक मंडळाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवू असे सांगितले होते. दरम्यान या सभेत दोघांना मयत घोषित केल्याने काही वेळ गोंधळ झाला होता.
या सभेस चेअरमन पुष्पलता बोबडे, व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे, संचालक ज्ञानवा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, विजय बनसोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी चेअरमन पुष्पलता बोबडे यांनी विषय वाचनाला सुरुवात केली. त्यावेळी संचालकांनी विषय वाचन करुन त्यांच्या विषयांना अनुमोदनही दिले. सभेमध्ये एक-एक विषय मंजूर होत असताना शेवटच्या विषयावेळी बलवंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हातात बोर्ड घेवून निषेध नोंदवायला सुरुवात केली. त्याच दरम्यान, संचालक मंडळांतील माजी चेअरमन किरण यादव यांच्यासह संचालकांनी प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देवून असे आश्वासन दिले.
चेअरमन सौ. पुष्पलता बोबडे म्हणाल्या, सभासदांची मागणी विचारात घेवून संचालक मंडळाने विविध कर्जाचे व्याजदरात कपात करून सभासदांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बँकेने सभासदांच्या आजारपणाची मदत, मयत सभासद मदत, विविध प्रकारचे अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा व नफा पातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठी उपाययोजना केल्यामुळे, तसेच खर्चातील काटकसर यामुळे ३१ मार्च २0२५ च्या अखेरीस रू. ७ कोटी ७५ लाख ढोबळ नफा तर रू.२ कोटी ९८ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाने सभासदांसाठी खास सवलतीच्या व्याजदरात नवीन कर्ज सुविधा केलेल्या आहेत, असे सांगितले.
व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे यांनीही नेट बँकींग व्यवहाराद्वारे प्रत्येक ग्राहकास एका दिवशीची मर्यादा २ लाख इतकी केली आहे. येणाऱ्या स्पर्धेच्या काळात सहकाराचे तत्व जपत बँकेचे सभासद आणि खातेदार यांची विश्वासार्हता जपून शिक्षक बँकेचा नावलौकिक उत्तरोत्तर वाढविण्यासाठी संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवेल, असे मत व्यक्त केले. विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले यांनी केले.
सभेवेळी माजी चेअरमन बलवंत पाटील हे शिक्षक नेते उदय शिंदे, विश्वंभर रणनवरे, सिद्धेश्वर पुस्तके यांच्यासोबत बसलेले होते. विषय वाचन सुरु असताना शेवटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेवून निषेध नोंदवायला सुरुवात केली. तेव्हा सभा संपल्यानंतर बलवंत पाटील यांनी त्यांना शांत करत बँकेवर त्यांनी आरोप केला. दरम्यान, त्यांच्या आरोपाच्या पत्रकावर पत्रकांनीच तेथेच उत्तर दिले गेले.
शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बँकेच्या सत्तेत असलेले आणि विरोधक असे सगळेच नेते अपवाद वगळता एकत्र पहायला मिळत होते. कोणताही वाद होवू द्यायचा नाही. यासाठी त्यांच्याकडून अगोदरच्या बैठकीत नियोजन केल्यानुसार सभा पार पडली. त्यामध्ये शिक्षक संघटनेचे नेते उदय शिंदे, विश्वंभर रणनवरे, दीपक भुजबळ, सिद्धेश्वर पुस्तके, विठ्ठल माने, चंद्रकांत यादव यांचीही सभेच्या शेवटपर्यंत उपस्थिती होती.
सभा संपल्यानंतर काही सभासद जेवणाकडे वळाले, तर काही सभासद हॉलमधून बाहेर पडले, तर काही तेथेच बोलत थांबले. त्यामध्ये एका गटात धक्काबुक्कीची घटना प्रवेशद्वाराजवळ जेथे नाव नोंदणी सुरु होती तेथे झाली. लगेच शिक्षक नेते बलवंत पाटील हे तेथे गेले त्यांनी वाद करणाऱ्या दोघांमध्ये समेट घडवून आणला. त्यामुळे तेथे नेमकी धक्काबुक्की कोणाला झाली, अशी चर्चा सुरु होती.
बँकेची सभा संपत असतानाच व्यासपीठाच्या समोरच सभासदांनी मागण्या लावुन धरत प्रतिसभा घेतली. त्यावेळी शिक्षक नेते बलवंत पाटील यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर टीकेची झोड उठवली. व्यासपीठावरुन दोघे कर्जदार सभासद मयत असल्याचे व त्यांचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्या सभासदांनीच फोनवरुन संपर्क साधला. याबाबत बलवंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मयत सभासदांचे कर्जे माफ केल्याचे दाखवूत ते पैसे संचालकांना हडप करायचे असल्याची भूमिका दिसून येत असल्यामुळे सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष हणमंत रसाळ यांनी सांगितले.