कोरेगाव : शहरातील जळगाव रस्त्यावर असलेल्या शुभलक्ष्मी इलेक्ट्रिकल्स अँड मशिनरी या दुकानात कामाला असलेल्या राजस्थानमधील एका कामगारानेच मालकाच्या घरावर डल्ला मारत सुमारे पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कोरेगाव शहरातील जळगाव रस्त्यावर शंकर राम चौधरी यांचे शुभलक्ष्मी इलेक्ट्रिकल्स अँड मशिनरी नावाचे शेती उपयोगी साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात त्यांनी राजस्थान राज्यातील दिनेश चौधरी (वय २०) याला कामगार म्हणून ठेवले होते. तो दिवसभर दुकानात काम करून रात्री दुकानाच्या वरच्या मजल्यावरील मालकांच्या घरातच राहत होता.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिनेश चौधरी याने घरातील सर्वजण झोपेत असताना खाली दुकानात जाऊन स्क्रू ड्रायव्हर व इतर साहित्य आणले. त्यानंतर मालक घरी नसल्याचा फायदा घेत बेडरूममधील कपाट उघडून त्यातील दोन लाख रुपयांची रोकड तसेच सुमारे तीन लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, दिनेश चौधरी हा शनिवारी रात्री सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पाठीवर स्कूल बॅग घेऊन दुकानासमोरील गेटमधून बाहेर जाताना दिसून आला. तसेच रविवारी दिवसभर तो आढळून न आल्याने त्याच्यावर संशय बळावला. याप्रकरणी शंकरराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत.