मुंबई : सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारख नाही. आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदनादायी आहे. परंतु, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. माझ्यासाठी हे केवळ एक पद नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी पूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने काम करेन, असा शब्द उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सुनेत्रा पवार यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थितांना संबोधित करताना जेव्हा जेव्हा अजित पवार यांचा उल्लेख करण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. अजित पवार यांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादा या वादळाशी मी ४० वर्षे संसार केला आहे. अजितदादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे पाहिले आहे. त्यांचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे, म्हणूनच काम करतच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. ग्रामीण भागात आपला पक्ष मजबूत आहे. आता शहरातही आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही
आता केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही, तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस माझे कुटुंब आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आता सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही. मात्र, त्याने दिलेला विचार आणि शिकवण पुढे घेऊन जायची आहे. आपणास शारदाबाई पवार यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचे आहे, दादा अचानक गेले आणि मोठमोठ्या सगळ्या जबाबदारीचे ओझे ठेऊन गेले. सगळ्यांच्याच अपेक्षांचे ओझे आहे, याची जाणीव मला आहे. यापुढे महाराष्ट्राचे कल्याण आणि जनतेचे भले हेच लक्ष असणार आहे, असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार आपल्यात नाहीत, हे वास्तव मान्य करायला हवे
अजित पवार आपल्यात नाहीत, हा आघात प्रचंड मोठा असला तरी वास्तव मान्य करायला हवे. आपल्या सर्वांना आता यातून सावरावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर तो विचार आहे. पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी निर्धाराने पुढे जावे लागणार आहे. अजित पवारांची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दाखवलेली वाट, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द आणि शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची खरी ताकद आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे, पण इथेच आपली जबाबदारी संपत नाही. शेतकरी महत्त्वाचा घटक आहे. दादांनी शेतीसाठी एआय टेक्नॉलॉजी आणली होती, त्यावरही आपल्याला काम करायचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.