साताऱ्यात गांजा, एमडी व गुटखा विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; कारवाईची मागणी करत दिला आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर आंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

रक्षक प्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनानुसार, शहरी तसेच ग्रामीण भागात अल्पवयीन मुले गांजा व अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळत असून त्यामुळे गुन्हेगारी घटनांत वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे कार्यकर्त्यांकडे असल्याचेही रक्षक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले आहे.

देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एमडी गोळ्या व इतर नशेच्या पदार्थांचे आकर्षण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंदी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवकांसह अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

बाजारपेठांमध्ये सर्रास अंमली पदार्थांची विक्री होत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती मिळत असेल तर संबंधित यंत्रणांना का मिळत नाही, असा सवाल करण्यात आला आहे.

संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर आंमली पदार्थ व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापूर परिक्षेत्रात १५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश
पुढील बातमी
वळसे येथे ड्रायव्हरला मारहाण; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या