पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमार्फत 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजुरीसाठी पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिककल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले. या संदर्भातील शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अंतर्गत व पोहोच रस्ते, संरक्षक भिंती, आरसीसी गटार, सभामंडप आणि ग्रामपंचायत कार्यालयांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्री देसाई यांनी हा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून खांडेकरवाडी, राममळा, शिंदेवाडी (गोषटवाडी), बोर्गेवाडी, काळगाव, बादेवाडी, गुढे, ऐनाचीवाडी, ढाणकल, कडववाडी, जाळगेवाडी, माथणेवाडी, शिंगणवाडी, सडाकळकी, सूर्याचीवाडी, बाटेवाडी, म्हावशी, आंब्रुळे, निसरे, कुसवडे, रामेल, बांधवाट, केंजळवाडी, डफळवाडी, घाणव, येरफळे, आटोली, काळगाव, कोरडेवाडी या गावांमधील अंतर्गत व पोहोच रस्त्यांची सुधारणा आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
मरळी येथे मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विविध गावांमधील सभामंडप, संरक्षक भिंती, बहुउद्देशीय इमारती, ग्रामसचिवालये व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना संरक्षण भिंती उभारण्याच्या कामांचाही समावेश आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना दिल्याचे या पत्रकात नमूद आहे.