सातारा : रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या वतीने शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या समाजासाठी काही योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सुधीर भिडे यांनी केले.
सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा छोटेखानी कार्यक्रम अशोकराव गोडबोले यांच्या श्रीराम या निवासस्थानी झाला. त्यावेळी डॉ. भिडे बोलत होते. गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचा ट्रस्टच्या या उपक्रमाचे हे ५४ वे वर्ष आहे. गोडबोले ट्रस्टच्या या उपक्रमामुळे होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोठा दिलासा मिळत असतो. विद्यार्थ्यांनी यांची जाणीव ठेवून चांगले शिक्षण घ्यावे, असे आवाहन डॉ. भिडे यांनी केले.
रा. ना. गोडबोले यांच्या आठवणी सांगून डॉ. सौ. मीरा दीक्षित यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ट्रस्टच्या वतीने सातारा भूषण पुरस्कार देण्यात येतो. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी खूप शिकले पाहिजे. विचार घेऊन जायला हवे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. या मदतीतून शिक्षण पूर्ण करुन कोणत्याही क्षेत्रात असं काम करावं की सातारा भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांनी कष्ट करुन मोठे नाव कमवावे आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडावे, असे सौ. बकुल फाटक यांनी सांगितले. डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक भाषणात ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोकराव गोडबोले यांनी केले. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चैतन्य गोडबोले यांनी आभार मानले.
यावेळी उदयन गोडबोले, आयडीबीआय ट्रस्ट च्या मानसी माचवे व त्यांच्या सहकारी तसेच प्रा. अविनाश लेवे - देशमुख, विजय मांडके, श्रीकांत कात्रे, जाधव, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
१९ ऑगस्ट रोजी पुढील कार्यक्रम
मंगळवार दि. 19 ऑगस्ट रोजी सातारच्या प्रतापगंज पेठ येथील आयडीबीआय ट्रस्टच्या सभागृहात याच अनुषंगाने शैक्षणिक मदतीच्या वाटपाचा पुढील कार्यक्रम होणार असल्याचे तसेच या कार्यक्रमाची संबंधित विद्यार्थ्यांना पत्रे पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे डॉ अच्युत गोडबोले व प्रद्युम्न गोडबोले यांनी दिली.
गोडबोले ट्रस्टच्या वतीने दिलेल्या मदतीची जाणीव ठेवून चांगले शिक्षण घ्या !
डॉ. सुधीर भिडे यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 11 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा