ना. शिवेंद्रसिंहराजेमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

मकरंद देशपांडे; इलेक्ट्रिक सायकलसह ८०३ वस्तूंचे दिव्यांगांना वाटप

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा :  दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी विविध उपक्रम राबवत आहे. समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सेवा सुशासन पंधरवडा' आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक सायकल, व्हील चेअर यासह आवश्यक अशा ८०३ साहित्याचे वाटप करण्यात आले. ना. शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांनी केले. 

सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात भाजपच्या 'सेवा सुशासन पंधरवडा' निमित्त ना. शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना ७५ इलेक्ट्रिक सायकल, ७० व्हील चेअर, १२ कमोड चेअर, १३६ अंध काटी, ३६ दिव्यांग काटी, ५ एल बो स्टिक, २३० श्रवण यंत्र, ४७ वॉकर, ८ कुबडी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देशपांडे बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, माजी आ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, सरिता इंदलकर, लोकसभा संयोजक सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम, धैर्यशील कदम, सातारा मंडल अध्यक्ष महेश गाडे, जावली मंडल अध्यक्ष संदीप परामने, मारुती चिकणे, धनंजय जांभळे, श्रीहरी गोळे यांच्यासह भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दिव्यांगांना फुल नाही फुलाची पाकळी देता आली याचे समाधान: ना. शिवेंद्रसिंहराजे  

दिव्यांग बंधू आणि भगिनींना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. त्यांच्यासाठी होईल एवढी मदत नेहमीच करत आलो आहे. आज पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि 'सेवा सुशासन पंधरवडा' निमित्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना फुल नाही फुलाची पाकळी देता आली, त्यांना मदत करता आली याचे मला मनस्वी समाधान आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले याप्रसंगी म्हणाले. मी व माझ्या सहकाऱ्यांनी गरजू दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल, व्हील चेअर व इतर आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय घेतला. कोणतीही शासकीय मदत न घेता मला हे करता आले, त्यासाठी देवाने मला सक्षम बनवले यासाठी मी देवाचे आभार मानतो. दिव्यांग बंधू आणि भगिनींचे त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी राहोत, हीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो, असे ते म्हणाले. 

राज्यभरात भाजपच्यावतीने 'सेवा सुशासन पंधरवडा' अभियान सुरु आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिव्यांगांसाठी जे दान दिले आहे ते अनमोल आहे. राज्यात मंत्री म्हणून काम करत असताना ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आपल्या जनतेकडे कायम लक्ष असते. त्यांनी दिव्यांगांना जी भेट दिली आहे, एवढे मोठे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही केलेले नाही. ना. शिवेंद्रसिंहराजे जनसामान्यांची हरप्रकारे काळजी घेणारे नेतृत्व आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे, असे आ. अतुल भोसले याप्रसंगी म्हणाले. 

मिळालेल्या साहित्याबद्दल उपस्थित दिव्यांग बांधव, भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. अविनाश कदम यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोरे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संदीप परामने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग बांधव, भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कार्यमुक्तीसाठी बदली शिक्षकांची आर्त हाक
पुढील बातमी
मिलिटरी अपशिंगे येथील एएसपी शाळेतर्फे ४ साहित्य संमेलनास ३४ हजारांची मदत

संबंधित बातम्या