पिकअप व कारचा भीषण अपघात

अपघातात एक ठार; तिघे जखमी

by Team Satara Today | published on : 19 July 2025


फलटण : येथील श्रीराम साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर रोडवर पिकअप व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक ठार झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

अभिजीत रामभाऊ मोरे (रा. झिरपवाडी ता. फलटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पिकअप चालक आदित्य विनोद भोईटे (रा. पिंप्रद, ता. फलटण), प्रसाद उर्फ चिकू राजेंद्र मोरे (रा.झिरपवाडी, ता फलटण), रोहन आप्पासाहेब कापसे (रा. कापसेवस्ती पिंप्रद ता. फलटण) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 18 जुलै रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान श्रीराम साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ फलटण येथून पिकअप (क्र. एम एच 11 डीडी 6456) या गाडीने पिंप्रद बाजूकडे जात असताना समोरून पंढरपूर बाजूकडून आलेल्या इर्टिगा (क्र. एमएच 46 इए 5984) च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये इर्टिगाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात जखमी झालेल्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ईर्टीगा चालकाचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद रोहन कापसे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. तपास फलटण पोलिस शहर ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
शस्त्राचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना अटक; सातजण फरार

संबंधित बातम्या