पिकांचे पंचनामे, पूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार मदत : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

by Team Satara Today | published on : 29 September 2026


यवतमाळ : पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले. यवतमाळ दौऱ्यावर त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधून शासनाची भूमिका मांडली.
ते म्हणाले, घाईगडबडीने मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे. दुष्काळी मदतीतून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कुणी मागणी केली म्हणून लगेच मदत जाहीर करून टाका, असे चालत नाही. घाईत मदत जाहीर केली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे संपूर्ण अहवाल येणे आवश्यक आहे. तूर, कापूस, सोयाबीन, हळद, संत्री व बागायती पिकांच्या नुकसानीचे निकष वेगळे आहेत. या सर्वांचे अचूक पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकृतरीत्या मदत जाहीर करतील.
दुष्काळाचे राजकारण नको
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, दुष्काळाचे राजकारण करणे चुकीचे आहे. दुष्काळाच्या झळा शेतकरी आणि शेतमजुरांना बसत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. तसेच, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून पत्र देणे हे त्यांचे कामच आहे; पण केवळ पवारांनी पत्र दिले म्हणून आम्ही मदत करत आहोत, असे नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाहतूक नियम मोडलात तर थेट वीज बिलातच येणार दंडाची रक्कम; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
पुढील बातमी
महाराष्ट्र, कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून तीव्र चिंता; केंद्रीय पथक करणार पाहणी - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान

संबंधित बातम्या