वादळी पावसाने कोसळली चिलेवाडी प्राथमिक शाळेची भिंत; डॉ. प्रिया शिंदे यांच्याकडून पाहणी, नवीन स्मार्ट स्कूल उभारण्याच्या सूचना

by Team Satara Today | published on : 11 June 2026


सातारा : कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट, जीर्ण इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव आणि नवीन स्मार्ट स्कूल उभारणीसाठी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

चिलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या दगडी बांधकामाच्या वर्गखोल्यांची भिंत वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे कोसळली. सुदैवाने शाळेला सध्या सुट्टी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. मात्र 1954 साली बांधण्यात आलेली ही शाळा इमारत प्रथमदर्शनी अत्यंत जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याचे पाहणीत निदर्शनास आले.

यावेळी डॉ. प्रिया शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक तो अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर करून पुढील कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

नवीन शाळा इमारतीसाठी किमान चार वर्गखोल्या तातडीने मंजूर करून त्या ’स्मार्ट स्कूल’च्या निकषांनुसार विकसित करण्याबाबतही डॉ. शिंदे यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले. तसेच शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, डॉ. प्रिया शिंदे यांनी नागेवाडी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळेलाही भेट देऊन तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या.

या पाहणी दौर्‍यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तांबोळी, विजयभाऊ घोरपडे, तंटामुक्ती अध्यक्ष भाडळे, भाडळेचे सरपंच सुनील घोरपडे, चिलेवाडीचे सरपंच गणेश ढोले, उपसरपंच नरेश ढोले, भरतआप्पा मुळे आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देवस्थान इनाम जमिनी शेतकर्‍यांच्या नावावर करा; शेतकर्‍यांच्या मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, आदेशाची प्रतीकात्मक होळी
पुढील बातमी
जि. प. च्या स्थायी समिती सभेत महत्त्वाच्या आषाढी वारी, पाणीटंचाई, शाळा प्रवेश तयारीवर चर्चा

संबंधित बातम्या