साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी 'अजिंक्यतारा'कडून २५ लाख ; संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान द्यावे - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 22 November 2025


सातारा : राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडून सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपये देणगी दिली आहे. सातारा येथे १९९३ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची मागणीही अजिंक्यतारा कारखान्याच्या लेटरहेडवर स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केली होती. आज ३२ वर्षांनी साताऱ्यात साहित्य संमेलन होत असून अजिंक्यतारा साखर कारखान्याने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील आपले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २५ लाख रुपये मदतीचा धनादेश ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहितें आदी उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराज यांनी साहित्य व सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी नेहमीच बळ दिले. त्यांच्या नेटक्या नियोजनामुळे साताऱ्यात १९९३ साली साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन झाले होते. त्यावेळीही अजिंक्यतारा कारखान्यांमार्फत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी मोलाचा हातभार लागला आहे. 

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे

अजिंक्यतारा कारखाना सामाजिक बांधिलकी जोपासण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. होऊ घातलेले साहित्य संमेलन यशस्वी व्हावे, त्याद्वारे साताऱ्याचे नाव अधिक उज्वल व्हावे, यासाठी अजिंक्यतारा कारखाना सहकार्य करत आहे. साहित्य संमेलन नेटके, नियोजनबद्धरीत्या यशस्वी व्हावे, यासाठी संयोजन समिती परिश्रम घेत आहे. सातारकरांनीही संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केले. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवघ्या बारा तासांत रिक्षा चोरीचा तपास; सातारा डी.बी. पथकाची कर्नाटकात कारवाई; अट्टल चोरटा जेरबंद, चोरीची रिक्षा जप्त
पुढील बातमी
पुसेगावचा सेवागिरी रथोत्सव १८ डिसेंबरला; जाहिरात, दिनदर्शिका प्रकाशन उत्साहात : दि. १४ ते २४ डिसेंबरदरम्यान यात्रा प्रदर्शन

संबंधित बातम्या