कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ट्रक-कारची भीषण धडक; साताऱ्यातील एकाच कुटुंबातील पाचजण जखमी

by Team Satara Today | published on : 25 May 2026


शाहूवाडी : साताऱ्याहून गणपतीपुळ्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या कदम कुटुंबाच्या कारला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथे भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले असून, ट्रक चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत कदम हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी साताऱ्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास वारूळ फाट्याजवळ समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील चालक श्रीकांत पांडुरंग कदम (वय ४४), ​ज्योती श्रीकांत कदम (वय ३८), पांडुरंग चिमाजी कदम (वय ६५), शारदा पांडुरंग कदम (वय ६०), ​स्वरा श्रीकांत कदम (वय १४) हे पाच एकाच कुटूंबातील सदस्य आणि सुधीर नारायण वाघडे (वय ४० वर्षे, सर्व रा. सातारा) जखमी झाले आहेत. ​यापैकी श्रीकांत कदम आणि ज्योती कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

समोरून कार येत असल्याचे पाहताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून आपले वाहन उजव्या बाजूच्या डिव्हायडरवर चढवले. ट्रक चालकाच्या या तत्परतेमुळे कार ट्रकच्या पूर्णपणे खाली दबली गेली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बोगदा येथील अपघातप्रकरणी बस चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
डायल 112 क्रमांकावर खोटा दूरध्वनी करून दिशाभूल करणाऱ्या एका तरुणावर कराड तालुका पोलिसांनी गुन्हा

संबंधित बातम्या