खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत महामार्गालगत झुडुपांमध्ये तरुणीचा मृतदेह; डोळ्यांमध्ये मिरची पुड टाकून हत्या करण्यात आल्याचा संशय

by Team Satara Today | published on : 14 September 2026


खंडाळा : खंडाळा तालुक्यातील राजेवाडी गावच्या हद्दीत शिदेंवाडी-भोर महामार्गालगत असणाऱ्या एका शेतालगतच्या झुडुपांमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. डोळ्यांमध्ये मिरची पुड टाकून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. तरुणीचे वय २५ ते ३० वर्षे असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, शिदेंवाडी-भोर रस्त्यावर राजेवाडी गावच्या हद्दीत एका शेतालगतच्या झुडूपांमध्ये एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळाली. शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे, कीर्ती म्हस्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भगत यांनी तात्काळ सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, व शिरवळ रेस्क्यू टिमसह धाव घेतली.
झुडुपामधून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. संबंधित तरुणीच्या डोळ्यात मिरची पुड टाकल्याचे आढळून आले. फलटण येथील फाँरेन्सिक टीमला बोलाण्यात आले. फाँरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. मयत तरुणीचा मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते.
मिरची पुड टाकून तरुणीची हत्या?
तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर मिरची पुड टाकलेली आढळून आली. त्यामुळे तरुणीचा दुसऱ्या ठिकाणी खून करुन मृतदेह राजेवाडी हद्दीत आणून टाकला असावा, अशी एक शक्यता वर्तविली जात आहे.  संबंधित तरुणीचा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची दाट शक्यता असून युवती गरोदर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने शिरवळ पोलीसांनी तपासाला वेग दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाषा कोणतीही असो, भावना भारतीय पाहिजे; भारताची भाषा ही एक असली पाहिजे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
पुढील बातमी
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीत गॅस गळती होऊन स्फोट; इमारत कोसळली, कंपनीला सुटी असल्याने अनर्थ टळला

संबंधित बातम्या