पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चिपळूण-कराड मार्ग सुरू

by Team Satara Today | published on : 03 July 2025


कराड : चिपळूण-कराड मार्गावरील वाजेगाव येथे पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारपासून हा मार्ग एस.टी. बसेस आणि लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी अद्याप अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

वाजेगाव येथील नाल्यावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने नाल्यातूनच एक तात्पुरता रस्ता तयार केला होता. मात्र, दि. 17 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा भराव वाहून गेला आणि चिपळूणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा कुंभार्ली घाट मार्ग पूर्णपणे बंद झाला. सुरुवातीला 48 तासांत डागडुजी करून केवळ खासगी छोट्या वाहनांना प्रवेश देण्यात आला होता. हा मार्ग बंद झाल्याचा सर्वाधिक फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे. बुधवारी सकाळपासून उत्तर रत्नागिरीतील आगारांच्या एस.टी. बसेस कुंभार्ली घाटमार्गे कोयना, पाटण, कराडकडे रवाना झाल्या आहेत.

पंधरा दिवस उलटले तरी चिपळूण-कराड मार्ग सुरू होत नाही. याची दखल येथील स्थानिक आमदार शेखर निकम यांनी घेतली आणि मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी पर्यटन मंत्री व पाटणचे स्थानिक आमदार शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हा रस्ता तत्काळ सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा, अशी विनंती केली. अखेर त्याला यश आले असून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले

संबंधित बातम्या