राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन

दिवाळीत घरगुती आगी लागण्याचा धोका वाढतो

by Team Satara Today | published on : 16 October 2025


मुंबई : दिपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग, फटाक्यांमुळे होणारे अपघात, शॉर्टसर्किट्स तसेच गर्दीच्या ठिकाणी गोंधळ यासारख्या घटनांची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन दीपावली सण साजरा करावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

दीपावलीच्या कालावधीत दिवे, मेणबत्त्या आणि फटाके वापरताना घरगुती आगी लागण्याचा धोका वाढतो. फटाके फोडताना मुलांना भाजणे किंवा इतर इजा होऊ शकते. तसेच, विद्युत सजावट करताना निष्काळजीपणा केल्यास शॉर्टसर्किट्स होऊन आग लागण्याची शक्यता असते. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि गोंधळ यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

नागरिकांनी फटाके केवळ परवाना असलेल्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. फटाके फोडताना सुताचे किंवा सूती कपडे वापरावेत; सैल किंवा सिंथेटिक कपडे टाळावेत. लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवावे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे. फटाके फोडताना पाण्याची बादली, वाळू आणि प्राथमिक उपचार पेटी जवळ ठेवावी. घरात किंवा बंद जागेत फटाके फोडू नयेत. झोपताना किंवा घर सोडताना सर्व विद्युत दिवे बंद करावेत. एकाच सॉकेटमध्ये अनेक दिवे जोडणे टाळावे.

संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून उच्च जोखमीच्या भागांमध्ये संयुक्त जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, शाळा आणि स्वयंसेवी संस्था यांनी आग प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम राबवावेत. तसेच सोशल मीडिया, स्थानिक मंडळे आणि मंदिरांमधून प्रतिबंधात्मक सूचना प्रसारित कराव्यात, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आगीमध्ये दोन एकर ऊस जळून खाक
पुढील बातमी
महिलांच्या 103 तक्रारींचा जागेवर निपटारा; सासपडे प्रकरणातील आरोपीला फाशी होईपर्यंत पाठपुरावा करणार : महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर

संबंधित बातम्या