यंदा थेट पावसाळ्यात 'ग्रेटर फ्लेमिंगो'ची राजेवाडी धरणावर हजेरी; पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांच्याकडून पाच प्रौढ फ्लेमिंगोची नोंद

by Team Satara Today | published on : 16 August 2026


येरळवाडी : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाणथळ परिसरात हिवाळ्यात आढळणाऱ्या ‘ग्रेटर फ्लेमिंगो’नी यंदा आपल्या नेहमीच्या अधिवासाला पाठ दाखवत पावसाळ्यात हजेरी लावली आहे. याबाबत पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी नुकतीच ‘ई-बर्ड’ जागतिक पक्षी नोंद प्रणालीवर राजेवाडी धरणावरील पाच प्रौढ फ्लेमिंगोची नोंद केली. ऑगस्ट महिन्यात झालेले हे दुर्मिळ दर्शन पक्ष्यांच्या बदलत्या अधिवासाकडे लक्ष वेधणारे ठरले आहे.

माण तालुक्यातील येरळवाडी तसेच परिसरातील अन्य पाणथळ जागा फ्लेमिंगोंच्या हिवाळ्यातील पारंपरिक अधिवासासाठी ओळखल्या जातात. मात्र, यंदा हिवाळ्यात या भागात फ्लेमिंगोची नोंद झाली नव्हती. त्यानंतर थेट पावसाळ्यात राजेवाडी धरणावर त्यांचे दर्शन झाल्याने पाण्याची पातळी, अन्नाची उपलब्धता आणि हवामानातील बदलांचा त्यांच्या स्थलांतरावर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फ्लेमिंगो हे स्थलांतर करणारे पाणपक्षी असून उथळ पाण्यातील शैवाळ, सूक्ष्मजीव आणि लहान जलचर घटकांवर उपजीविका करतात. साधारणपणे हिवाळ्यानंतर फ्लेमिंगो प्रजननासाठी गुजरातमधील कच्छच्या रणाकडे स्थलांतर करतात. मात्र, प्रजनन न करणारे काही प्रौढ पक्षी अनुकूल परिस्थिती आणि मुबलक खाद्य उपलब्ध असल्यास नेहमीच्या स्थलांतराचा प्रवास न करता एखाद्या भागात अधिक काळ मुक्काम करू शकतात. याला ‘ओव्हर-समरिंग’ म्हटले जाते.

राजेवाडी धरणावरील सध्याची उथळ पाण्याची स्थिती या पक्ष्यांसाठी खाद्य शोधण्यासाठी पोषक ठरली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात फ्लेमिंगोनी राजेवाडी तलावात हजेरी लावली असण्याचे संकेत मिळत आहेत. राजेवाडी धरणावरील या दुर्मिळ दर्शनामुळे सातारा जिल्ह्यातील पाणथळ अधिवासांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या परिसरातील फ्लेमिंगोंच्या हालचालींकडे पक्षी अभ्यासकांचे लक्ष राहणार आहे.

येरळवाडी व माण तालुक्यातील इतर पाणथळ जागांवर यंदाच्या हिवाळ्यात फ्लेमिंगोची नोंद झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये राजेवाडी धरणावर पाच प्रौढ फ्लेमिंगो दिसणे हे अधिवास आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या स्थानिक स्थलांतराचे संकेत देणारे आहे. हवामानातील बदल आणि पाणथळ जागांच्या पाणी पातळीतील अनिश्चिततेमुळे फ्लेमिंगो पक्षी नेहमीची ठिकाणे बदलत असण्याची शक्यता आहे.

-डॉ. प्रवीण चव्हाण, पक्षी अभ्यासक, वडूज


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी

संबंधित बातम्या