अचानक पगार थांबवल्याने सांख्यिकी विस्तार अधिकाऱ्यांचे वडूजला शांततामय लाक्षणिक आंदोलन

by Team Satara Today | published on : 21 October 2026


वडूज : एक सप्टेंबर पासून अचानक पगार थांबवल्याने बालविकास महिला व बालविकास विभागाच्या सांख्यिकी विस्तार अधिकाऱ्यांनी 22 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सांख्यिकी विस्ताराधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या सहीचे निवेदन सर्व स्तरावरील मान्यवरांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वडूज पंचायत समितीच्या समोर अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक शांततामय आंदोलन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्याची एक प्रत गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली
 जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागातील सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना ग्रामविकास खात्यामध्ये पंचायत विस्तार अधिकारी पदावर नेमले जाणार आहे. परंतु अजून त्यांचा आकृतीबंध तयार नाही. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत सांख्यिकी विस्तार अधिकारी यांचे सेवा देण्याचे अविरत काम बाल विकास विभागात चालू आहे. तरीही त्यांना केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पगार न देणे अनुचित आहे .बालविकास विभागाच्या पदाच्या आकृतीबंधातून सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे.
सध्या कामावर रुजू असून सुद्धा वेतन थांबणे चुकीचे  आहे आणि त्यामुळे कित्येकांना घर चालवणे सुद्धा अवघड आहे.सप्टेंबर महिन्याची सेवा केल्यानंतर तसेच ऑक्टोबर महिन्याचे बारा दिवस सेवा केल्यानंतर अचानक पगार पत्रकातून सांख्यिकी विस्तार अधिकारी यांना वगळण्यात आले. त्यामुळे सर्वच या पदावरील कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक धक्का बसला असून घरात सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.याबाबतीत सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजेच अंगणवाडी विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख ज्यांच्या अंतर्गत सांख्यिकी विस्ताराधिकारी काम करत आहेत. अंगणवाडी विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जिल्हा कार्यक्रमाधिकारी नागेश ठोंबरे यांना त्यांना याबाबत भेटले असता त्यांनी शासन स्तरावरून काही सूचना येईपर्यंत पगार काढण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. शासन स्तरावरून कोठून तरी ग्रीन सिग्नल आल्याशिवाय कोणतेतरी पत्र आल्याशिवाय आम्ही पगार काढू शकत नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच बालविकास विभागाच्या आयुक्त कार्यालयातून मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल जाणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांना संघटना भेटली असता त्यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आज दिनांक 22 ऑक्टोबर पासून  जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मुंबई येथे काम बंद आंदोलन सुरू होत आहे अशी माहिती श्री क्षीरसागर यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ओव्हरटेकच्या प्रयत्नात कराटे गावाजवळ एक जीप दरीत, दुसरी उलटली; दहा प्रवासी जखमी
पुढील बातमी
समर्थ खामकर, समशेर शिंदे, दिव्यांशु डुबल व शौर्य पवार यांना सुवर्णपदक ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

संबंधित बातम्या