सातारा : सातारा शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या नंदगळकर टोळीतील तिघांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले आहेत.
कासिम नंदगळकर वय 30 राहणार निसर्ग कॉलनी निशिगंध अपारमेंट बुधवार नाका शाहूपुरी, टोळी सदस्य शाहरुख शमशुद्दीन पठाण वय 25 राहणार शनिवार पेठ, शाहरुख नौशाद खान वय 30 राहणार नवजीवन कॉलनी सोमवार पेठ सातारा अशी संबंधितांची नावे आहेत.
या टोळीच्या विरोधात जबरी चोरी, चोरी करताना जाणीवपूर्वक दुखापत करणे, घरफोडी, उपासना स्थळांवर चोरी करणे इत्यादी गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी टोळी विरुद्ध दोन वर्ष तडीपार करणे बाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी या प्रस्तावाची चौकशी केली होती. वारंवार सुधारण्याची संधी देऊनही या टोळी सदस्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नंदगळकर आणि त्याच्या दोन साथीदारांना सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र पोलीस कायदा 55 प्रमाणे 39 उपद्रवी टोळ्यांमधील 134 इसमांना आतापर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, मोका, एमपीडीए यासारख्या कठोर कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे समीर शेख यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, केतन शिंदे, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी याबाबतचे योग्य पुरावे सादर केले.