सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळला. या पावसाने पश्चिमेकडे थैमान घातले. विशेषत: वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा व कराड या तालुक्यातील शेतकर्यांना फटका बसला आहे. या तालुक्यात 28 घरांची पडझड झाली असून 361 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धो-धो पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पश्चिम भागात झालेल्या या अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सहा तालुक्यातील 28 घरांची पडझड झाली असून पाटण व वाईमध्ये पाणी शिरल्याने 85 दुकानदार बाधित झाले. 129 कुटुंबातील 361 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पाटण तालुक्यातील वाहतुकीसाठी नेरळे पूल व मूळगाव पूल रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवजा-कोयनानगर पाबळनाला रस्ता खचल्याने बंद आहे. गुरुवारी पावसाचा जोर ओसरल्याने बंद केलेले उर्वरित रस्ते व पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पावसामुळे धोका निर्माण झाल्याने 129 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. संबंधित नागरिक परिसरातील शाळा तसेच नातेवाईकांकडे राहण्यासाठी आहेत. पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
पश्चिमेकडे गुरूवारी पावसाची उघडझाप सुरू होती. दिवसभर जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. तसेच अधूनमधून जोरदार वारेही वहात होते.धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोयना 69 मि. मी., नवजा 78 मि.मी., महाबळेश्वर 125 मि.मी., धोम 12 मि.मी., धोम बलकवडी 71 मि.मी., कण्हेर 20 मि.मी., उरमोडी 41 मि.मी., तारळी 17 मि.मी., वीर 2 मि.मी. पावसाची नोंद झाली. सातारा 12.0 मि.मी., जावली 12.2 मि.मी., पाटण 10.4 मि.मी., कराड 6.1 मि.मी., कोरेगाव 4.2 मि.मी., खटाव 2.0 मि.मी., माण 0.8 मि.मी., फलटण 0.3 मि.मी., खंडाळा 2.9 मि.मी., वाई 12.3 मि.मी., महाबळेश्वर 62.9 मि.मी. पावसाची नोंद झाली.