सातारा : विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नसले तरी आगामी आषाढी वारी, दुष्काळी भागातील पाणीपुरवठा, शाळा प्रवेशोत्सव आणि शेतकर्यांना मार्गदर्शन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आषाढी वारीच्या नियोजनासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या 20 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीबद्दल सभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा परिषद, सातारा येथील जुन्या लोकल बोर्ड इमारतीतील नवीन समिती सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची सभा उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती लता कर्णे तसेच समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील उपस्थित होते.
सभेमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी आगमनानंतर करावयाच्या विविध कामांचे सूक्ष्म नियोजन, वारकर्यांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा तसेच प्रशासनाने घ्यावयाच्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वारीच्या यशस्वी आयोजनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजनांवरही सभेत चर्चा झाली. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा 15 जूनपासून सुरू होत असल्याने शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकार्यांनी उपस्थित राहण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना पेरणीसंदर्भात योग्य मार्गदर्शन, हवामानानुसार नियोजन आणि कृषी विभागामार्फत आवश्यक सूचना देण्याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली.
सभेस जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, अशोक पाटील, वसंत मानकुमरे, धनंजय चव्हाण आणि उदयसिंह पाटील उपस्थित होते. याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.