सातारा : जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर, ता. पाटण जि. सातारा येथे सातारा सिंचन मंडळ, सातारा जिल्ह्यासाठीची रब्बी हंगाम सन 2024-25 कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील,आमदार मनोज घोरपडे आदी मान्यवरांसह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी व तारळी या 5 मोठ्या सिंचन प्रकल्पांचा दिनांक 15 ऑक्टोबर 2024 चा उपयुक्त पाणीसाठा 40.73 टीएमसी (100%) आहे. गतवर्षी या प्रकल्पांचा दिनांक 15 ऑक्टोबर 2023 चा उपयुक्त पाणीसाठा 31.05 टीएमसी (76.23%) होता. 10 फेब्रुवारी 2025 अखेर या पाचही प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा 30.7% टीएमसी म्हणजेच 76 टक्के उपलब्ध आहे. यावर्षी पर्जन्यमान पुरेसे झाल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. याचा आढावा घेऊन ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे, ते लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन जलसंपदा विभागाने वितरित करावे.
धरणे कालवे जुने झाले आहेत. त्यांच्या पुनर्जीवनाची आवश्यकता व्यक्त करून त्या दृष्टीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम (एमआयटी) मध्ये कण्हेर- नेर मध्यम प्रकल्प दोन यासाठीच्या कामांसाठी चे काही प्रस्ताव घेतलेले आहेत. सातारा जिल्ह्यात यासाठी 1210 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा अंतर्गत येणार्या महामंडळा बाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, महामंडळानेही आपल्या स्तरावरून निधी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत. त्यांची स्वायत्तता टिकली पाहिजे. पुरेसा निधी उपलब्ध व्हावा आणि शेतकर्यांसाठीचे हे पाण्याचे सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी हे आवश्यक आहे.
कोयना प्रकल्प हा महाराष्ट्राचा कायाकल्प करणारा प्रकल्प आहे. ही महाराष्ट्राची ऊर्जा वाहिनी आहे, असे सांगून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत लोकप्रतिनिधींनी ज्या मागण्या गेलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांची पूर्तता विहित कालावधीमध्ये करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. अनेक धरणे जुनी झालेली आहेत. बांध जुने झालेले आहेत. कालव्यांची वाहन क्षमता कमी झालेली आहे. ज्या कॅनॉलची वाहन क्षमता वाढविणे आवश्यक आहे त्यासाठी प्रस्ताव तयार करावेत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा मंत्री यावेळी म्हणाले.
कण्हेर, उरमोडी धरणातील पाणी सातारा शहरासाठी राखीव आहे. यात कोणताही बदल करू नये. तसेच उरमोडी धरणावरील कालव्यांची दुरुस्ती करावी, कोल्हापूर बंधारे यांचीही दुरुस्त करावी, अशी सूचना वजा मागणी मी बैठकीत केली. बैठकीत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा आणि निर्णय झाले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य, जलसंपदा विभागाचे सांगली आणि साताराचे अधिकारी उपस्थित होते.