सातारा आरटीओच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. जिल्ह्यातील जनतेच्या खिशावर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अक्षरशः दरोडा टाकला जात आहे. हा अनागोंदी कारभार त्वरित न थांबल्यास, येत्या आठ दिवसात या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवलेली आहे. या कार्यालयातील प्रत्येक कामात हप्तेखोरी सुरू आहे. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वालीच उरला नाही. ओव्हर लोडिंग वाहने, खाजगी ट्रॅव्हल्स, वडाप, फिटनेस टेस्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पंधरा वर्षापूर्वींच्या वाहनांचे पासिंग, रिक्षा परमिट, जिल्हा व राज्याबाहेरील वाहनांचे ट्रान्सफर, पीयूसी चालकांकडून मंथली हप्ते, ड्रायव्हिंग स्कूल, चालक परवाना नूतनीकरण, फिटनेस टेस्ट इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी करून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या जिल्ह्यातील जनतेच्या खिशावर अक्षरशः दरोडा टाकण्याचे काम सुरू असून, हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. येत्या आठ दिवसांमध्ये या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
रस्ते, पालखी तळ दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा : जयकुमार गोरे

संबंधित बातम्या