कराड : जुन्या कार्वे-कोडोली मार्गालगत थडगा नावाच्या शिवारात पाणी योजनेच्या विहिरीसाठी ब्लास्टिंग केल्यानंतर उडालेला दगड लागून शेतकर्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाली असून, त्यानुसार पाच ते सहाजणांवर याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.
दत्तात्रय पांडुरंग बामणे (वय 55, रा. कार्वे, ता. कराड) असे दगड लागून मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. धीरज दत्तात्रय बामणे (29, रा. कार्वे) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी वडगाव पेयजल योजनेशी संबंधित प्रशासकीय अधिकारी डेप्युटी इंजिनिअर शिरसाठ, कॉन्ट्रॅक्टर एस. एन. इंगवले व कर्मचारी, ब्लास्टिंगचे काम करण्याकरिता वापरलेले वाहन, चालक व मालक, तसेच संबंधित कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वे - कोडोली जुना रस्ता येथील थडगा नावाच्या शिवारात मागील एक महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत वडगाव पेयजल योजनेच्या विहिरीचे काम चालू आहे. त्याठिकाणी खोदकाम करण्यासाठी सुरूंगाचा वापर करून अधूमिधून ब्लास्टींग करण्यात येत असते.
शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय बामणे हे शेतात गेले होते. त्यांच्या शेताजवळच वडगाव पेयजल योजनेच्या विहिरीचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खोदकामासाठी ब्लास्टींग करण्यात आले. त्यावेळी ब्लॉस्टींगचा वेगाने आलेला दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला लागल्याने त्यांच्या बरगड्या तुटून फुफुसामध्ये रक्तस्त्राव झाला होता. गंभीर जखमी दत्तात्रय यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारसाठी मिरज येथे हलविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी धिरज हा आपल्या मित्रांसमवेत वडिलांना पुढील उपचारासाठी रूग्णवाहिकेतून घेऊन जात असताना पाचवड फाटा परिसरात गंभीर जखमी दत्तात्रय बामणे यांचा मृत्यू झाला होता.
भूसुरूंग करताना अधिकार्याने व ठेकेदाराने नियमांचे पालन केलेले नाही. परिसरातील लोकांना सूचना दिली नव्हती. सुरक्षा जाळीचा वापर केला गेला नव्हता असे तक्रारीत नमूद करण्यात आहे.