बाळासाहेब व आबासाहेब पाटणच्या विकासाचा पाया घालणारे मूळपुरुष; ना. शंभूराज देसाई; शिवाजीराव देसाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन

by Team Satara Today | published on : 20 November 2025


पाटण : तालुक्यातील आज दिसणारी विकासाची गती ही अनेक वर्षांच्या संघर्षाची, दूरदृष्टीची आणि त्यागाची देण आहे. या सर्व विकासाच्या पायाभूत वाटचालीला दिशा देणारे खरे मूळपुरुष म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी चेअरमन अशोकराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्व. शिवाजीराव देसाई यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, स्व. आबासाहेबांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना उभारून सहकार क्षेत्राला दिलेली गती, शिक्षण क्षेत्रातील बांधिलकी आणि शेतकरीहितासाठी घेतलेली परिश्रमाची झळ यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. “त्या काळातील कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून जे रोपटे लावले, ते आज वटवृक्षात वाढताना दिसत आहे. हे पाटण तालुक्याच्या इतिहासातील अभिमानास्पद पान आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “विकासाची सुरुवात कोणी केली, त्याला बळ कोणी दिले, आणि आज दिसणाऱ्या प्रगतीचा पाया कोण घालून गेला, याची जाणीव नागरिकांनी सतत ठेवली पाहिजे. या दोन महापुरुषांच्या आदर्शांच्या आधारेच आपली भावी वाटचाल असली पाहिजे. त्यांच्या स्मृतीतूनच आपल्याला पाटणच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशा मिळते.”

व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी प्रास्ताविक केले. बबनराव शिंदे यांनी आभार केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आर्यांग्ल हॉस्पिटलच्या कार्यविस्तारासाठी सातारकरांनी सहभाग द्यावा - सौ. वेदांतिकाराजे भोसले; अतिदक्षता विभागातील डायलिसिस विभागाचे उद्घाटन
पुढील बातमी
संगीतामध्ये तणाव मुक्तीची ताकद- मुकुंद फडके; दीपलक्ष्मी सभागृहांमध्ये गाण्यांची मैफल संपन्न

संबंधित बातम्या