गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. बाप्पाच्या स्वागतासाठी जशी जोरदार तयारी केली जाते तशीच तयारी बाप्पाच्या विसर्जनासाठी सुद्धा केली जाते. बाप्पाच्या आगमनामुळे घरात सगळीकडे आनंद असतो. प्रत्येक घरात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक, रवा मोदक, चॉकलेट मोदक, तळलेले मोदक इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये वाटीभर पनीरचा वापर करून चविष्ट रसमलाई मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मोदक घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया रसमलाई मोदक बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य:
पनीर
वेलची पावडर
दूध पावडर
पिठीसाखर
केशर
ड्रायफ्रूट
तूप
दूध
कृती:
रसमलाई मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पनीर टाकून बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेले पनीर टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात मिल्क पावडर, काजू पावडर, पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणात सगळ्यात शेवटी दुधात भिजवलेल्या केशराच्या काड्या आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेले मिश्रण ताटात काढून थंड करा. त्यानंतर मोदकांच्या साच्याला तूप लावून त्यात सारण भरून मोदक बनवून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रसमलाई मोदक. हे मोदक घरी आलेल्या पाहुण्याना खूप जास्त आवडतील.