फडणवीसांच्या नेतृत्वात दावोसमध्ये महाराष्ट्राचा विक्रम

४.९९ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

by Team Satara Today | published on : 22 January 2025


दावोस : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार तीन लाख कोटींचा असून हा ‘जेएसडब्ल्यू’शी करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी नाशिकसाठी मात्र कुठलाही करार झाल्याचे समोर आले नाही.

मंगळवारी दावोसमध्ये पहिला करार हा गडचिरोलीसाठी झाला. संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी कल्याणी समूहाशी हा करार करण्यात आला. यात पाच हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, चार हजारांवर रोजगार निर्मिती होणार आहे. मंगळवारी झालेल्या करारांत कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाइल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

लॉजिस्टिक, ऑटोमोबाइल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील पाच हजार युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वात मोठा म्हणजे तीन लाख कोटी रुपयांचा करार ज्यांच्या कंपनीशी झाला ते जेएसडब्लू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. हा करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा असल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिंदाल यांचे आभार मानले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि उच्चाधिकारी यावेळी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती
पुढील बातमी
शेखर गोरेंच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्यांचे शंभू महादेवाला साकडे

संबंधित बातम्या