मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; धरणाचा पाणीसाठा १४ टीएमसीवर

by Team Satara Today | published on : 05 July 2026


सातारा  : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धुवाधार बरसणाऱ्या पावसाने कोयना धरणातील पाणीसाठा आणि आवक यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान विभागाने आज रेड अलर्ट ज्वारी केला होता. त्यानुसार पश्चिम घाटावर पावसाने जोरदार हजेरी लावली. सह्याद्रीच्या रंगांमधील घाटमाथ्यावर, तसेच कोयना, पाथरपुंज या ठिकाणी अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना नवजा व महाबळेश्वर येथे गेल्या १२ तासांत तब्बल ७८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मोरणा गुरेघर, साखरी-चिट्टेघर, बिबी या लघुपाटबंधारे प्रकल्पात ही पाण्याची वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने डोंगराळ भागात लहान-मोठे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. धरणात २९ हजार १६४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

धरणाचा पाणीसाठा १४ टीएमसीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणातील पाणीसाठा यापेक्षाही जास्त होता. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना २३१, नवजा २६१, तर महाबळेश्वर २९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १२ तासांत पाणलोट क्षेत्रातील एकूण पाऊस ७८७ मिलिमीटर नोंदवला आहे, तर एक जून ते आजपर्यंत कोयना ६६४, नवजा ९२४ व महाबळेश्वर येथे ९३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत पाणलोट क्षेत्रात एकूण पाऊस २५२२ मिलिमीटर झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विश्वासू जीवनवाहिनी; सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
पुढील बातमी
देशातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहू लागला; यंदाच्या पर्यटन हंगामाचा उत्साहात शुभारंभ

संबंधित बातम्या