सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कामकाजात संगमेश्वर तालुक्यातील बामणोली आणि जावली तालुक्यातील कसबे बामणोली या एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या गावांचा संदर्भ वापरून पर्यटन व विकास निधी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप वन्यजीव अभ्यासक संतोष जाधव यांनी केला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित नोंदी व कामकाजात तातडीने दुरुस्ती न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २१ ऑगस्ट २०१२ च्या शासन अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचित बफर क्षेत्रात समाविष्ट आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कसबे बामणोली हे गाव मेढा प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचित बफर क्षेत्राचा भूभाग नाही.
दरम्यान नावातील साम्याचा आधार घेत जावली तालुक्यातील कसबे बामणोली येथे व्याघ्र प्रकल्पाच्या निधीतून विविध विकासकामे झाली आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रासाठी मंजूर होणारा पर्यटन व विकास निधी केवळ अधिसूचित गावांमध्येच खर्च करण्याची तरतूद असताना, निधी इतरत्र वळविल्याने शासनाची दिशाभूल झाल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये निसर्ग पर्यटन, स्थानिक रोजगार आणि संवर्धनात्मक विकासाला चालना देण्याचा मूळ उद्देशच बाधित होतो.
दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अधिसूचित भूभाग सुमारे १,१६५.५७ चौ.कि.मी. असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार या क्षेत्राबाहेर प्रकल्पाचा पर्यटन अथवा विकास निधी खर्च करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने नोंदीत दुरुस्ती करावी, अन्यथा या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमका वाद काय?
रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि साताऱ्याच्या जावली तालुक्यात 'बामणोली' नावाची दोन वेगवेगळी गावे आहेत.
संगमेश्वरचे बामणोली हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचित बफर क्षेत्रात समाविष्ट आहे.
जावलीतील कसबे बामणोली हे मेढा प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येते.
नावातील साम्याचा आधार घेत तत्कालीन अधिकाऱ्यांनी ही गंभीर चूक केल्याचे समोर आले आहे.
व्याघ्र प्रकल्पाबाहेरील गावात 'जन-वन' समिती?
जावली तालुक्यातील कसबे बामणोली येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत लाखो रुपयांचा शासकीय निधी वितरित झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचित कोअर किंवा बफर क्षेत्रात समाविष्ट नसेल तर त्या नावाखाली समितीला प्रशासकीय मान्यता निधी मंजुरी आणि निधी खर्च करण्याची प्रक्रिया नेमकी कोणत्या नियमांच्या आधारे राबविण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.