फलटण हादरले ! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून; लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट

by Team Satara Today | published on : 22 January 2026


फलटण : प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खुनानंतर मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे करून काही अवयव नदीत फेकून, उर्वरित मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सागर दादासो दडस यांनी बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी आपला भाऊ सतीश ऊर्फ आप्पा दादासो दडस हरविल्याची तक्रार दाखल केली होती. विडणी परिसरात शोध घेऊनही सतीशचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, सागर यांना त्यांच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली. लखन बुधवाले याचा फोन आला असून, “सतीश ऊर्फ आप्पा दडस याला लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांनी काठीने मारहाण करून दूर सोडून दिले आहे,” असे सांगण्यात आल्याचे समोर आले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील सतीश ऊर्फ आप्पा दडस याचे १४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते. या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.

यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात आणण्यात आले. मात्र, पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्घृण मारहाण करण्यात आली.

या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केला. मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात, मुंडके व पाय निरा नदीत फेकून देण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला, अशी कबुली संशयितांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात उपनगराध्यक्ष निवडीला नाट्यमय वळण; मनोज शेंडे यांच्या ऐवजी ॲड. दत्ता बनकर यांना संधी ; खासदार उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्र
पुढील बातमी
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात गॅलेक्सी समूहचा एक महत्त्वाचा टप्पा; गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पजच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

संबंधित बातम्या